top of page
Search

भावनिक क्षमता किंवा भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय ?

Updated: Jan 25, 2022

प्रथमतः आहे हे समजून घेणे गरजेचे आहे की भावनिक क्षमता आणि भावनिक बुद्ध्यांक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्वतःच्या भावभावनांना नीट ओळखता येणे आणि त्यातील वाईट आणि चांगल्या भावनांना वेगवेगळे करता येण. यानंतर त्यातील नकारात्मक भावना म्हणजेच हिंसक वृत्ती, द्वेष, राग, लोभ, अहंकार, मत्सर, हेवा अशा इत्यादी गोष्टींवर विजय मिळवणं त्यातील चांगल्या भावभावना म्हणजेच चांगुलपणा, सहिष्णुता, मदत करण्याची वृत्ती अशा भावनांना वाढीस लावणे; त्याचबरोबर या सद् भावनांना ओळखून त्यांना शिस्त लावणे म्हणजे भावनिक क्षमता. भावनिक क्षमतेचे मापन केल्यावर मिळणाऱ्या अंकाला किंवा प्रमाणाला भावनिक बुद्ध्यांक असे म्हणतात.


बौद्धिक क्षमता आणि भावनिक क्षमता यामध्ये पूर्वी बौद्धिक क्षमतेला जास्त महत्त्व होतं परंतु संशोधन केल्यानंतर संशोधकांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे की सद्यस्थितीमध्ये बौद्धिक क्षमतेपेक्षा भावनिक क्षमतेला जास्त महत्त्व आहे. आपण अनेकदा सभोवताली अशा व्यक्ती बघतो, ज्या अतिशय बुद्धिमान व हुशार असतात, मात्र आयुष्यातील साधी आव्हाने स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते. अनेकदा ‘बुद्धिमत्ता’ परीक्षेमध्ये गुण मिळवून देऊ शकत नाही अथवा कामाच्या ठिकाणी पुरेशी ‘बुद्धिमत्ता’ असूनही फारशी प्रगती साधता येत नाही. या आणि अशा अनेक वेगवेगळ्या घटनांमधून आपल्याला हे पाहता येते की, ‘बुद्धिमान’ व्यक्ती ही ‘यशस्वी’ व्यक्ती असतेच असे नाही. किंबहुना त्यांच्या अपयशाचे गमक हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळ्याच घटकांशी संबंधित असते. थोडक्यात आपल्या बुद्ध्यांकपेक्षा / आपल्या हुशारी पेक्षा भावनिक बुद्ध्यांक हा जास्त महत्त्वाचा ठरलेला आहे. तिला संतुलित ठेवणे, नियंत्रित ठेवणे आणि जोपासणे गरजेचे ठरत आहे. आता इथे पहिला प्रश्न निर्माण होतो की भावनिक क्षमता जोपासणे गरजेचे का आहे? ते कसे घडते? आणि त्यांनी काय होते?


आपण एका उदाहरणापासून सुरुवात करू- एखादी आई आपल्या मुलाला गणित शिकवते तेव्हा तिला ते गणित समजून घेण्याची किंवा त्याआधी पूर्वतयारी असण्याची गरज असते आणि तिने ते न केल्यास मुलाला ती संकल्पना नीट समजत नाही, ज्यामुळे शिकवताना आईला तो सारखे सारखे प्रश्न विचारतो यावर आई कंटाळून त्याला खूप रागवते. या प्रसंगामध्ये काय चूक आहे? तर आईने पूर्वतयारी केलेली नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई मुलाला रागवत असते तेव्हा तिला वाटते की ती त्याच्या प्रेमापोटी करते. पण यावेळी ती कठोर आणि निष्प्रेम ठरत असते. या सर्वांमध्ये मुलाच्या मनात गोंधळ निर्माण होतो, गणित विषयक भीती निर्माण होण्यास सुरुवात होते आणि अशा सततच्या घटना सुरू राहिल्यास त्याच्या आत्मविश्वासालाही तडा जातो. थोडक्यात काय तर आईने स्वतःच्या भावनांना नीट व्यक्त केलं नाही यामुळेच या मुलाच्या भावनांना निष्कारण त्रास पोहोचला. या उलट जर तिने पूर्वतयारी केली असती आणि स्वतःच्या भावनिक क्षमतेचा योग्य वापर करून विचारपूर्वकतेने ती वागली असती तर मुलाला गणित समजून घेण्यास मदत झाली असती. गणित विषयाची भीती निर्माण न होता गणित आवडू लागले असते आणि त्याच्या आत्मविश्‍वासाला धक्का लागला नसता.


म्हणजेच आपण जेव्हा स्वतः आपल्या भावनांना शिस्त लावत नाही, आपल्या भावनिक क्षमतेला जोपासत नाही तेव्हा आपण स्वतः बरोबर इतरांच्या भावना समजून घेण्यास असमर्थ ठरतो. जेव्हा आपण आपल्या भावना ओळखायला शिकतो तेव्हा मला काय वाटतंय? मला असं का वाटतं? हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. एखादी गोष्ट मनाला लागली तर ती का घडली? आणि यापुढे असे होऊ नये यासाठी आपण विचार करतो. स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहतो, त्यांना ओळखायला लागतो तेव्हा आपले विचार सुरळीत राहतात आणि या शिवाय स्वतःच्या भावनांना सवय लावून शिस्तशीर बनवलं तर त्याच्या सुसूत्रतातेमुळे आपण यशाची पायरी चढत राहतो. स्वतःला ओळखल्याने इतरांच्या भावना ओळखण्यास मदत होते आणि यामुळे समोरच्याशी अधिक विचारपूर्वक रीतीने आपण वागतो. एकमेकांच्या भावनांचा विचार केला जातो व त्या योग्य प्रकारे व्यक्त होतात आणि त्या नात्याच्या बळकटीसाठी याची मदत होते. जसे वरील उदाहरणात आईने मुलांशी प्रेमाने वागल्यास आईच्या प्रेमाच्या वागणुकीचे बीज मुलांच्या मनात रुजून त्याला त्याची सवय लागते. परंतु अशा प्रकारे भावनिक क्षमता वाढवण्यासाठी प्रत्येकाला अनेक परिश्रम करावे लागतात. शून्यापासून सुरुवात करून प्रत्येक भावनेशी सखोल ओळख करून घ्यावी लागते. त्यानंतर त्याला सुसंस्कृत पणे व्यक्त करण्याची काटेकोर शिस्त लावावी लागते. यामुळे प्रत्येक ठिकाणी - घरात बसून ते कामाच्या ठिकाणापर्यंत, शाळेपासून ते खेळाच्या मैदानापर्यंत सगळ्या ठिकाणी भावनांची देवाणघेवाण योग्य रितीने झाल्यास आपले जीवन सुखकर बनत जाते.आपल्या सर्वानाच कधी ना कधी स्वत:च्या भावनांवर ताबा नसल्याचा अनुभव आला आहे. यामागील एक कारणमीमांसा म्हणजे भावनांचा आणि मेंदूचा गुंतागुंतीचा असलेला संबंध.


पंचेंद्रियांकडून मिळालेला कोणताही संदेश हा मेंदूतील thalamus (थॅलॅमस)कडे पाठवला जातो व तेथून त्याचे रासायनिक संदेशात ‘भाषांतर’ केले जाते. अशा प्रकारे बहुतेक सर्व संदेश मेंदूच्या वस्तुनिष्ठपणे विचारप्रक्रिया करणाऱ्या केंद्रकाकडे पाठवले जातात. मात्र, अशा संदेशांमध्ये भावनांचे मिश्रण असल्यास हे संदेश अमिग्डेला (amygdala) या मेंदूमधील भावनिक केंद्राकडे पाठवले जातात. याच वेळेस संदेशातील बहुतेक भाग हा मेंदूतील वस्तुनिष्ठपणे विचार करणाऱ्या केंद्रकाकडे पाठवला जातो व काही भाग सरळ अमिग्डेलाकडे जातो. मेंदूला या संदेशावर पूर्णपणे वस्तुनिष्ठपणे काम करण्याची संधी न देताच हा संदेश अमिग्डेलाकडे जातो. म्हणजेच काही संदेशांसाठी प्रतिसाद हा केवळ लगेचच मिळणारा भावनिक प्रतिसादच असतो.


मेंदू आणि भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो व मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर बदलत असतो. इथे लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या भावनांना दूर लोटण्याचा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा अथवा त्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. आपल्या भावना या सतत आपल्या बरोबर असतात. आपल्या भावनांची मूळे आपल्या उत्क्रांतीमध्ये व जीवशास्त्रामध्ये दडलेली आहेत. आपल्या भावनांविषयी माहिती करून घेणे व त्यावर योग्य नियंत्रण मिळवणे हे आपल्यासाठी गरजेचे आहे.


भावनिक क्षमतांमध्ये काही गोष्टींचा समावेश होतो

 • स्वतःच्या भावना नीट ओळखणे

 • स्वतःच्या भावनांना ओळखून त्यांना शिस्त लावून योग्य प्रकारे व्यक्त करणे

 • याचा सराव करून प्रत्यक्षात कृती करून स्वतःला सवय लावणे आणि स्वतःसोबत दुसर्‍याच्या भावना जाणून त्यांचा आदर करणे

या शिवायआज 21 व्या शतकात फक्‍त हार्ड स्किल्स पुरेशी नाहीत, तर अतिशय उच्च दर्जाची सॉफ्ट स्किल्स मागितली जातात.

उदा.

 • इतरांशी मिळून मिसळून वागण्याची वृत्ती व क्षमता.

 • परिणामकारक नेतृत्वशैली.

 • इतर लोकांचा विकास व त्यांना नवीन शिकण्याची संधी देणे इ.

 • स्वत:च्या क्षमता अधिक प्रगल्भ करणे.

 • सुसंवाद व संभाषण कौशल्य

 • आपल्या विचारप्रणालीचा यथायोग्य उत्तम वापर.

 • टीका किंवा अवघड प्रसंगातील सकारात्मक दृष्टिकोन

 • धोक्‍याच्या काळात शांत व स्थिर राहणे.

 • इतरांची मते आणि विचार समजावून घेण्याची क्षमता.

 • वरील सर्व सॉफ्ट स्किल्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय.

या क्षमतेमुळे इतरांसोबत व्यवहार करणं आपोआप सोपे होऊन जातं. जीवन तणावरहित होत जात आणि यामुळे व्यक्तीला अधिकाधिक आनंदात जगता येत. आत्मविश्वास जोपासण्यास मदत होते. आपण इतरांच्या भावनांना महत्त्व देतो, दुसऱ्याला समजून घेतो, त्याच्या सुखात आनंदी राहून दुःखावर फुंकर घालतो तेव्हा त्या व्यक्तीशी असलेले आपल् नातं, असलेल्या आपल्या स्नेहात भर पडते. दोघांचा एकमेकांवर विश्वास द्विगुणीत होऊन ते निकोप नातं बहुरंगी आणि सुखकर होत जात. शेवटी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काय करावं, ते कसं करावं, कोणत्याही गोष्टीला प्राधान्य द्यावं यासाठी हुशारी असून चालत नाही तिथे सारासार विचार करण्याची विवेकबुद्धी असणे म्हणजेच भावनिक क्षमता असणे गरजेचे असते. परंतु काही बुद्धिजीवी स्वतःच्या फक्त बुद्धीचा वापर करत असतात. ते बुद्धीच्या नादात नात्यांमध्ये भावनिक ओलावा ठेवण्यास विसरतात आणि अशा ओलाव्याच्या खडखडाटापायी ते आपली नाती हळूहळू गमावून बसतात. भावनिक शहाणपण नसून आजपर्यंत आपलं काहीच वाईट घडलं नाही असे त्यांना वाटत राहते आणि हा त्यांचा अहंकार असतो. या खटाटोपात त्यांचे जीवन तणावग्रस्त होत जातो. मग या बदल्यात ते त्याची लौकिकता व भौतिक सुखात मग्न होणे हा त्यांना सोपा उपाय वाटतो आणि मग स्वतः जवळ असलेला पैसा खर्च करण्यात वा हौस-मौज करण्यात ते धन्यता मानतात. या उलट एकदा ज्यांना हे शास्त्र समजल्यावर ते मनःपूर्वक कष्ट करतात, स्वतःच्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल घडवतात, स्वतः आतून एक अधिक अधिक चांगला माणुस घडवण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतात अशा लोकांचे जीवन पाहता पाहता तणावरहित होत जातं. सुखकर होत जात. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या सोबतच इतरांचेही भावनिक क्षमता जोपासण्याची प्रक्रिया सुरू होत असते.

चला तर मग ओळख करून घेऊ आणि भावनिक ओलाव्याच्या ओलाव्यात आनंदी जीवन जगू

Neha Upasani

- Cinq in (intern)

 

Cinq in is the best Counselling, Therapy & Holistic Complete Mental Health Clinic in Pune, Aundh

For counselling please get in touch with us

Email : info@cinq.co.in

Phone /Whatsapp : +91 800 7566 553

www.cinq.co.in www.curamind.in


Our Team :

Dr. Pranavjeet Kaldate | Consultant Psychiatrist

Piyusha Pande | Psychologist

Omkar Naik | Psychologist

60 views0 comments
bottom of page